राष्ट्रवादी काँग्रेस-कम्युनिस्ट नेते येणार एकाच मंचावर, रविवारी औरंगाबादेत कन्हैय्याकुमारची जाहीर सभा

Foto

औरंगाबाद -  ‘संविधान बचाओ, देश बचाओ या अभियानांतर्गत जेएनयूतील विद्यार्थी संसदेचे माजी अध्यक्ष आणि एआयएसएफचे उपाध्यक्ष कन्हैय्याकुमार यांच्या जाहीर सभेचे औरंगाबादेत आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आमखास मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण हे या जाहीर सभेचे मुख्य संयोजक आहेत. कन्हैय्याकुमार यांच्या सभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्टांमधील जवळीक वाढताना दिसत आहे. २०१९च्या लोकसभेचीच ही तयारी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

लोकसभेत डाव्यांनाही सोबत घेण्याची राष्ट्रवादीची तयारी

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झालेली आहे. भाजपला रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेस एक झाल्याअसल्यातरी भाजपेतर समविचारी पक्षांनाही एकत्र करण्याचे काम सध्या शरद पवारांकडून सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादेतील कन्हैय्याकुमार यांच्या सभेच्या आयोजनाकडे पाहिले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेते आणि पट्टीचे वक्ते असताना आमदार सतीश चव्हाण यांनी डाव्या विचारांचे आणि एआयएसएफच्या उपाध्यक्ष कन्हैय्याकुमार यांच्या सभेचे आयोजन केले असल्यामुळे आगामी निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षालाही आघाडीत सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे.

औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सुटली तर...

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४० जागांवर दोन्ही काँग्रेसचे जवळजवळ एकमत झाले आहे. उर्वरीत ८ जागांपैकी चार इतर मित्रपक्षांना देण्याचे ठरले असून उर्वरीत चार जागांची आदलाबदल करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला असल्याची चर्चा आहे. या चार जागांमध्ये औरंगाबादची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी अशी मागणी होत आहे. येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे संभावीत उमेदवार म्हणून आमदार सतीश चव्हाण हे सध्या चर्चेत आहे. पक्षाने आदेश दिला तर आपण निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे चव्हाण यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यासंदर्भात सांजवार्ता ऑनलाईनशी बोलताना शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करेल, असे सुचक वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे आमदार चव्हाण यांची लोकसभेच्या दृष्टीने जोरदार तयारी चालली असल्याचे पाहायला मिळते.

कन्हैय्याकुमार हे युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांची जहाल भाषा आणि थेट पंतप्रधान मोदींवरील शाब्दिक प्रहार सध्या देशभर चर्चेत आहेत. त्यांना ऐकण्यासाठी फक्त औरंगाबादच नाही तर संपूर्ण मराठवाड्यातून तरुण वर्ग येण्याची शक्यता आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्टांमधील जवळीक वाढण्याचीही शक्यता आहे.